रेल्वेच्या जाहिरातीत, दिल्ली पाकिस्तानात
Posted on Saturday, March 20, 2010 by maaybhumi desk
कोलकाता
भारताची राजधानी दिल्ली पाकिस्तानात आहे, किंवा कोलकता हे बंगालच्या खाडीत वसले आहे किंवा ग्वाल्हेर हे महाराष्ट्रात आहे असे सांगितल्यास तुम्ही समोरच्याला नक्कीच वेड्यात काढाल. पण ही करामत रेल्वेच्या अधिकार्यांनी करून दाखवली आहे. पूर्व रेल्वेने दिलेल्या जाहिरातीत अनेक शहरांना स्थानभ्रष्ट केले आहे.
कोलकत्याहून महाराजा एक्सप्रेस या नव्या गाडीचा शुभारंभ रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासंदर्भात ही जाहिरात होती. या जाहिरातीतील एका छोट्या चौकटीत या गाडीचा कोलकत्याहून दिल्लीपर्यंतचा मार्ग दाखवला होता.
कोलकत्याहून निघून ही गाडी गया, वाराणसी, बांधवगड, खजुराहो, आग्रा, ग्वाल्हेर आणि मग दिल्लीला पोहोचणार आहे. पण जाहिरातीतील दाखवलेल्या ठिकाणानुसार कोलकता बंगालच्या खाडीत आहे आणि दिल्ली पाकिस्तानात आहे, असे ध्वनित होते आहे. यांदर्भात पूर्व रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी समीर गोस्वामी यांनी माफी मागितली आहे. या जाहिरात एजन्सीला निलंबित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
संबंधित एजन्सीशी संपर्क साधल्यानंतर तिने या चुकीचे खापर आर्टिस्टवर फोडले. आम्ही लोकांच्या सोयीसाठीच नकाशा दिला होता. परंतु, आर्टिस्टने नकाशातील मापे चुकीची घेतली, असे त्यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "रेल्वेच्या जाहिरातीत, दिल्ली पाकिस्तानात"
Post a Comment