मी महाराष्‍ट्रीय असल्‍याचा अभिमानः अमिताभ

Posted on Sunday, March 28, 2010 by maaybhumi desk

पुणे (कविवर्य विंदा करंदीकर साहित्य नगरी)

मी आज जे काही आहे, तो महाराष्ट्रामुळेच, या पावनभूमीने मला नाव, कीर्ती, घर, पत्नी, प्रेम आणि सन्‍मान सर्व काही दिल. आयुष्‍याच्या 68 वर्षांपैकी 41 वर्ष मी या भूमीतच घालविली आणि जन्‍माने नसलो तरी कर्माने मी महाराष्‍ट्रीय असल्‍याचा मला अभिमान आहे, अशा शब्‍दात महानायक अमिताभ बच्‍चन यांनी महाराष्‍ट्र भूमीबद्दल आपली बांधिलकी व्‍यक्त केली.

83 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्‍या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अपेक्षेप्रमाणे हायकमांडच्‍या आदेशाचे पालन करीत मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण गैरहजर राहीले. त्‍यामुळे समारोप समारंभाचा 'महानायक' ठरण्‍याची संधीही अमिताभ यांना आपसूख आली.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाबद्दल उपस्थितांचे अभिनंदन करून अमिताभ म्हणाले, की ज्‍या प्रमाणे माळेमध्ये अनेक सुवर्णरत्ने असतात तशीच महाराष्‍ट्रातही अनेक नररत्ने जन्माला आली. या भूमीला माझा नमस्‍कार. मी आज जे काही आहे ते महाराष्‍ट्रामुळे आणि या बद्दल मला अभिमान आहे. 'लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, दात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी...' या कविवर्य सुरेश भट यांच्या मराठी अभिमान गीताच्या ओळी उद्धृत करताना ते म्हणाले, की अशा महानतेचा संदेश देणा-या महाराष्ट्राला माझा सलाम.

यावेळी त्यांनी विंदा करंदीकर, राम गणेश गडकरी व आपले बाबूजी हरिवंशराय बच्‍चन यांच्‍या कविताही सादर केल्‍या.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner