वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ 13 मजली मशिद!
न्यूयॉर्क
येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याच्या स्मृती जपून असलेल्या ग्राउंड जीरो जवळ उभारल्या जात असलेल्या मशिदीस अमेरीकन नागरिकांनी विरोध करण्यास सुरूवात केली असून अशा प्रकारची कुठलीही मशिद उभारणे हे या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान धडकून करण्यात आलेल्या मोठ्या दहशतवादी कारवाईत सुमारे 3000 लोक मारले गेले होते. या घटनेनंतर ही जागा मृतांचे स्मारक म्हणून अमेरीकन लोकांसाठी पवित्र बनली आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो लोक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत असतात.
या परीसरात 13 मजली मुस्लिम कम्युनिटी सेंटर उभारण्यात आले असून त्यात मशिदीसह स्वीमिंग पूल, जिम, थियेटर आणि क्रिडा सुविधाही असणार आहे. ही इमारत आणि मशिद उभारणे हा या हल्ल्यात मेलेल्या लोकांचा अपमान ठरेल असा पवित्रा येथील लोकांनी घेतला असून त्यास विरोध सुरू केला आहे.
येथील स्टॉप इस्लामाइजेशन ऑफ अमेरिका एक्टिविस्ट ग्रुपने या विरोधात पुढील महिन्यात मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.