श्रीराम सेना पैसे घेऊन दंगे करत असल्याचे उघड!
बंगळुरू
मंगलोरच्या एका पबमध्ये तरुणींना संस्कृतीच्या नावाखाली मारहाण करणा-या श्रीराम सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक हा पैसे घेऊन दंगे घडवत असल्याचे एका स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. आजतक या वृत्तवाहिनी आणि तहलका या न्यूज पोर्टलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही माहिती समोर आली आहे.
श्रीराम सेनेने आपण हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षक असल्याचा दावा करत अनेकदा दंगली आणि तोडफोड केली आहे.
सुमारे सहा आठवड्यांच्या या स्टिंग ऑपरेशनमधून मुतालिकचे धर्म प्रेम उघड झाले आहे. श्रीराम सेनेला पैसे देऊन पाहिजे त्या ठिकाणी दंगे घडवून आणता येत असतात.
असे झाले स्टिंग ऑपरेशन
या स्टिंग ऑपरेशन करणा-या पत्रकाराने आपण एक कलाकार असल्याची बतावणी करून आपल्या चित्र प्रदर्शनावर हल्ला करण्यासाठी पैसे देऊ केले. धर्माचे रक्षण करणा-या या संघटनेच्या नेत्यास आपण 'लव जिहाद' या विषयावर चित्रप्रदर्शन भरविणार असल्याचे या पत्रकाराने सांगूनही त्यांना त्यामुळे काहीही फरक पडला नाही.
श्रीराम सेनेने पैसे घेऊन आपल्या चित्र प्रदर्शनावर हल्ला करण्यास सांगितले. या हल्ल्यामुळे आपल्याला माध्यमात चांगली प्रसिद्धी मिळून आपण प्रसिद्ध होऊ आणि आपल्या चित्रांना विदेशात चांगली किंमत मिळेल असे त्याने सांगितले. तर त्या बदल्यात श्रीराम सेनेला आणि मुतालीकला राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळेल आणि पैसेही मिळतीलच, असे भासवण्यात आले. मुतालिक याने यास त्वरित होकार दिला आहे.
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर मुतालिक याने हे स्टिंग ऑपरेशन खोटे असल्याचा बनाव करत आपल्याविरुद्ध कट रचला जात असल्याचा आरोप केला आहे. तर संघ परिवाराने आपला या संघटनेशी काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले आहे.