विश्वनाथन आनंद चवथ्यांदा जगज्जेता
Posted on Thursday, May 13, 2010 by maaybhumi desk
भारताचा सुपर ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद याने बुल्गारियाच्या व्हॅसेलीन तोपालोव याला मंगळवारी 12 व्या आणि शेवटच्या फेरीत मात देत जागतिक बुद्धीबळ स्पर्धेवर आणि पुरस्कारावरही आपला ताबा कायम राखला. आनंदने जोरदार खेळ करत आपल्या कारकीर्दीत चवथ्यांदा जगज्जेता बनण्याचा मान पटकावला आहे.
आनंदने यापूर्वी 2000, 2007 आणि 2008 मध्ये जागतिक पुरस्कारावर ताबा प्रस्थापित केला आहे. आनंद आणि टोपालोव यांच्यात 12 व्या फेरीपूर्वी साडे पाच-पाच अंकांनी बरोबरी होती. दोघांमध्ये झालेल्या या चुरशीच्या खेळात अपेक्षेप्रमाणे आनंदने आपले स्थान कायम राखले.
टोपालोवविरुद्धचा विजय कठीण- आनंद
विजयानंतर आनंदने सांगितले, की टोपालोव विरुद्धची लढत सर्वात कठीण ठरली. यापूर्वी अशा कठीण लढतीला सामोरे जावे लागल्याचे मला आठवत नाही. टोपालोव खरंच तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे.
आनंद म्हटला, मी सकाळी उठलो तेव्हा काय होईल याचा अंदाज नव्हता. कारण आम्ही दोन्ही जण बरोबरीत होतो. यामुळे सामन्यात काहीही होऊ शकले असते. माझ्या एकाग्रतेची आणि संयमाची परीक्षा ही होती. त्यात मला यश आले, याबद्दल मी खूप आनंदी आहे.'
