नक्षलींचे हल्ले 'सायकोलॉजिकल वॉरफेयर'चा प्रकार
Posted on Wednesday, May 19, 2010 by maaybhumi desk
पावसाळ्यापूर्वी सुरक्षा दलांना जंगलात मोठी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी नक्षलवाद्यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली असून वेगवेगळे हल्ले करून निमलष्करासोबत मनोवैज्ञानिक युद्ध लढवण्याची युद्धनिती वापरण्यास सुरूवात केली आहे. दंतेवाडात सोमवारी बसवर झालेला हल्ला हा अशाच प्रकारच्या युद्धाचा भाग असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
एंटी नक्षल ऑपरेशनशी जोडल्या गेलेल्या पोलीस दलाच्या प्रमुख अधिका-यांच्या मतानुसार सामान्य जनता आणि लोकांवर सातत्याने होणारे हल्ले हे नक्षलवाद्यांच्या मनोवैज्ञानिक युद्ध (सायकोलॉजिकल वॉरफेयर) धोरणाचा भाग आहे. त्या योगे निमलष्करी दलाचे मनोबल खच्चीकरण करणे हा प्रमुख उद्देश असून अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे सरकारनेही पावसाळ्यात जवानांना जंगलाच्या आत पाठवणार नाही, असा नक्षलींचा प्रयत्न आहे.
बस्तरमध्ये कोया कमांडोंवर (एसपीओ) सोमवारी झालेला हल्ला हा नक्षलींसाठी मोठे यश आहे. नक्षलवाद्यांकडून नव्याने आढळून आलेल्या कागदपत्रांमध्येही जंगलातील लढाईत कोया कमांडोंबद्दल नक्षलींमध्ये अधिक भीती असल्याचे समोर आले आहे. कोया कमांडो हे एकेकाळचे नक्षलवादी किंवा नक्षलवाद्यांच्या विरोधात असलेल्या आदिवासी कुटुंबातील तरुण-तरुणी आहेत. या तरुणांना बस्तरमध्ये अनेक वर्षांपासून तैनात असलेल्या नागा बटालियनने प्रशिक्षण दिले आहे.
नागा बटालियन जंगल वॉरफेअरमध्ये देशातील सर्वांत शक्तीशाली फोर्स समजली जाते. नक्षलींविरोधातील कारवाईत कोया कमांडोंचा आजवरचा रेकॉर्ड अतिशय उत्कृष्ट असून चिंतलनार येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर एरिया डॉमिनेशनसाठी कोया कमांडोंचीच मदत घेण्यात आली होती.
कोया कमांडो आणि सैन्याला स्थानिक आदिवासींची मदत मिळू नये यासाठीही आदिवासींमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले केले जात आहेत.
