...असा झाला सीआरपीएफवर हल्ला
Posted on Wednesday, May 26, 2010 by maaybhumi desk
दंतेवाडा
छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे हरवलेल्या वायरलेस सेटमुळेच नक्षली हल्ल्यात 76 जवानांचा बळी गेल्याची नवीन माहिती समोर आली आहे. या हल्ला प्रकरणी अटक केलेल्या नक्षलवाद्यांच्या एका मुख्य कमांडरनेच ही माहिती दिली आहे. रविवारी या हल्ल्यात सहभागी असलेल्या नक्षली कमांडर बारसे लखमासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवारी पत्रकार परिषदेत लखमाने याबाबत सांगितले, की हरवलेल्या वायरलेस सेटचा शोध घेण्यासाठी जवान जंगलात परतले आणि एंबुशमध्ये फसले. ज्यावेळी नक्षली हल्ला झाला त्यावेळी अनेक जण झोपेत होते. चेह-याने अतिशय गरीब दिसणा-या जनमिलिशिया कमांडर बारसे लखमाची या हल्ल्यात महत्वाची भूमिका होती.
कोंटा ब्लॉकमधील कोत्तागुडा येथून आपल्या काही साथीदारांसह रविवारी अटक करण्यात आलेल्या लखमाने सांगितले, की गस्तीवर निघालेल्या सीआरपीएफ जवानांचा एक वायरलेस सेट त्यांना जंगलात सापडला. तो प्रमुख नक्षलवादी कमांडरकडे नेल्यानंतर त्यांना अधिक समजून घेण्यास वेळ लागला नाही. त्यानंतर लगेच 24 तासात हल्ल्याची तयारी करण्यात आली.
घटनेच्या पाच दिवसांपूर्वीच 31 मार्चला दोरनापालकडून अनेक गाड्या व फोर्स येत असल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली होती. चिंतलनारच्या भागात सीआरपीएफ जवानांची गस्त वाढली होती. दोरनापालकडे जवान परतले नसल्याचे कळल्यानंतर नक्षलींनी ते जंगलातच असल्याचा निष्कर्ष काढून हल्ल्याची तयारी केली. नक्षलवादी कमांडर पापारावने फोर्सवर हल्ला करण्यासाठी तया राहण्याच्या सूचना दिल्या. यानंतर दोन एप्रिलपासूनच मिलिशियाचे सदस्य चिंतलनार सीआरपीएफ कँप परिसरात तैनात झाले.
पाच एप्रिलच्या दिवशी रात्रीपर्यंत 200 नक्षलवादी कमांडर ताडमेटलाच्या परिसरात एकत्र झाले होते. लखमाने दिलेल्या माहितीनुसार तो स्वतःही 50 सदस्यांसह घटनास्थळाच्या परिसरात आला. साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास फोर्स याच दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पावणे सहा वाजेच्या सुमारास जाळ्यात अडकलेल्या सैन्यावर बेछुट गोळीबार करण्यास सुरूवात केली.
सीआरपीएफकडून प्रत्युत्तरा दाखल गोळीबार केला जाताच डाव्या व उजव्या बाजूने लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू केला. सुमारे दीड तास चाललेल्या गोळीबारानंतर जवानांकडून गोळीबार बंद झाला. यानंतर जखमी असलेल्या जवानांनाही नक्षलवाद्यांनी ठार केले.
घटनास्थळावरून जवानांचे शस्त्रास्त्रे, वारयलेस सेट, जॅकेट, बूट, गोळ्या, औषधी, ग्रेनेड यासह जवानांकडील पैसे, मोबाइल व घड्याळीही नक्षलींनी लुटुन नेल्या. घटनेनंतर दोन्ही बाजूने फोर्स येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही एलजीएस व मिलिशिया नक्षलवाद्यांना वगळता प्रमुख नक्षली कमांडर लुटलेले साहित्य घेऊन फरार झाले.
दुस-या दिवशी नक्षलवादी कमांडर पापारावने मोरपल्ली या गावात येऊन सर्व ग्रामस्थांना हल्ल्याच्या यशस्वीतेची कथा सांगून पुढच्या लढ्यासाठी तयार राहण्यास सांगितले.
 

 
