आमोद-प्रमोद गणरायाचे 'पद्मालय'

Posted on Friday, August 05, 2011 by maaybhumi desk

-विकास शिरपूरकर

जळगाव जिल्‍ह्यातील एरंडोल जवळ असलेल्‍या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्‍हणून प्रसिध्‍द आहे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. 'पद्म' म्‍हणजे कमळ आणि 'आलय' म्‍हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्‍ट्य लक्षात येते. येथे वेगवेगळ्या प्रकारच्‍या कमळांमुळे असलेल्‍या पद्मालय या नावावरूनच या ठिकाणाची ओळख पटते. या संस्‍थानला माधवराव पेश्‍ावे यांची सनद मिळाली आहे.

     
एरंडोलपासून सुमारे 10 किलोमीटरवर श्रीक्षेत्र पद्मालय आहे. मंदिराच्‍या गाभार्‍यात आमोद व प्रमोद अशा गणरायाच्‍या दोन मूर्ती आहेत. डाव्या व उजव्या सोंडेचे नवसाला पावणारे हे गणपती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दोन मूर्ती असलेले गणेशाचे हे कदाचित एकमेव मंदिर असावे. मंदिरातील या मूर्ती एक सहस्त्रअर्जुनाने आणि दुसरी श्रीशेषाने स्थापन केल्‍याचा उल्‍लेख श्रीगणेश पुराणातील उपासना खंडात आढळतो. या मूर्तींना



श्रीप्रवाळ गणेश म्हणतात. मंदिराच्‍या समोरील कमळाच्‍या तळ्यातून भाविकांना दर्शन देण्‍यासाठी या मूर्ती वर आल्‍याचा भक्‍तांचा समज आहे.

या गणेश मंदिराचे बांधकाम पुरातन असून ते कुणी बांधले याबाबतची माहिती अस्तित्‍वात नाही. मात्र, ते 1200 वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज आहे. मंदिराची सुमारे 35 फूट उंच भिंत एका अखंड पाषाणातून उभारली आहे. कळसावर तसाच अवजड प्रचंड घुमट आहे. मंदिराच्‍या परिसरातील इतर वास्‍तूंचे बांधकामही काळ्या पाषाणातूनच केलेले आहे. मंदिरापासून खालील तळ्यापर्यंत याच दगडाच्‍या पायर्‍या आहेत.

मंदिराच्‍या बाहेर मुख्‍य प्रवेशव्‍दाराजवळ सुमारे सव्‍वा तीन फूट व्‍यासाचे अवाढव्‍य दगडी जाते आहे. पूर्वीच्‍या काळी धान्‍य दळण्‍यासाठी अशा प्रकारच्‍या लहान जात्‍यांचा वापर घराघरात होत असते. मात्र येथे असलेल्‍या जात्‍यास 'भिमाचे जाते' म्‍हणून संबोधले जाते. हे जाते इतके अवाढव्‍य आहे, की सात-आठ दणकट माणसांनी प्रयत्न करूनही ते हलविणे शक्‍य होत नाही.

मंदिरात सुमारे 11 मण वजनाची (440 किलो) पंचधातूची अवाढव्‍य घंटा आहे. पद्मालयापासून 2 किलोमटीरवर भीमकुंड आहे.

येथे भीमाने बकासुराचा वध केल्‍याची आख्‍यायिका आहे. मंदिरात दरवर्षी कार्तिक पोर्णिमा, अंगारिका आणि संकष्‍टी चतुर्थीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.

कसे जालः पद्मालय येथे जाण्‍यासाठी जवळचे ठिकाण एरंडोल हे आहे. एरंडोल हे गाव धुळे व जळगाव या रस्‍त्‍यावर (सूरत-नागपूर महामार्गावर) आहे. एरंडोलपासून पद्मालयाला जाण्‍यासाठी दर तासांनी गाडी असते. तर जळगावहून सकाळी सात, नऊ आणि दुपारी 3 वाजता बसची सोय करण्‍यात आली आहे.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner