'गुलझार' गीतांचा जनक

Posted on Friday, August 05, 2011 by maaybhumi desk

आपल्‍यातील सदाबहार आणि गुलझार सृजनात्‍मकतेने चित्रसृष्‍टीला अनेक अमूल्‍य गीतांची आणि वैविध्‍यपूर्ण पटकथांची देणगी देणा-या संपूर्णसिंग कालरा यांचा जन्‍म 18 ऑगस्‍ट 1936 साली झाला. तत्‍कालीन अखंड हिंदुस्‍तानच्‍या आणि सध्‍या पाकच्‍या ताब्‍यात असलेल्‍या झेलम जिल्‍ह्यातल्‍या दिना या गावी माखनसिंग आणि सुजान कौर या दाम्‍पत्‍याच्‍या घरी हा मुलगा जन्‍माला आला. त्‍यावेळी कुणी विचारही केला नसेल, की मोठा झाल्‍यावर तो सगळे भेदभाव मिटवून सर्वांना एकसंघ करणा-या एका वेगळ्या जगातला मोठा माणूस होईल.

आयुष्‍याच्‍या सुरुवातीची काही वर्षे एका गॅरेजमध्‍ये कार मेकॅनिक म्‍हणून काम करणारा संपूर्णसिंग हा तरुण चित्रसृष्‍टीत 'गुलझार साहब' या नावाने आदराने ओळखला जातो. हिंदीच नव्‍हे, उर्दु, पंजाबी आणि मारवाडी भाषेतही त्‍यांनी विपुल लेखन करून आपल्‍या वाचकांमध्‍ये मानाचे स्‍थान मिळविले आहे.

भारतीय सिनेसृष्‍टीतील महत्‍वाचा भाग असलेल्‍या गीतांचा जन्‍मदाता असलेले गुलाझार साहब गेल्‍या 43 वर्षांपासून चित्रसृष्‍टीत आपले एक वेगळे आणि वैशिष्‍टपूर्ण स्‍थान टिकवून आहे. गुलझार यांनी आपल्‍या फिल्‍मी कारकिर्दीची सुरुवात सचिन देव बर्मन यांच्‍या 'बंदीनी' (1963) या चित्रपटापासून केली. यज्ञ या चित्रपटातील 'मोरा गोरा अंग लै ले' या गीताने गुलझार यांच्‍यातील प्रतिभा उफाळून आली. नूतन यांच्‍या अभिनयाने त्‍यात ख-या अर्थाने जान आणली. बिमल रॉय आणि ह्रषिकेश मुखर्जी या दोन कलांवतांच्‍या मार्गदर्शनाखाली त्‍यांनी बरेच काम केले. मात्र त्‍यांना ओळख मिळवून देणारी गीते आहेत, 'मुसाफिर हुं यारों' (परिचय), 'तेरे बिना जिंदगी से कोई' (आंधी), 'मेरा कुछ सामान...' (इजाजत), 'तुझसे नाराज नही जिंदगी' (मासूम). सलील चौधरींसह केलेला 'आनंद', मदनमोहन यांचासह बनविलेला मासूम आणि विशाल भारव्‍दाज सोबतचा 'माचिस', ए.आर. रहेमान सोबतचा 'दिल से' आणि 'गुरू' या चित्रपटांनी त्‍यांना अनेक पुरस्‍कार मिळवून दिले.





गुलझार यांनी दिग्‍दर्शित केलेल्‍या सुरुवातीच्‍या चित्रपटांतून त्‍यांच्‍यावर डाव्‍या विचारसरणीचा मोठा प्रभाव असल्‍याचे दिसून येतो. त्‍यातील मेरे अपने असो किंवा भारतीय राजकारणावर परखडपणे कोरडे ओढणारा ऑधी असो. यातून ते अनेकदा स्‍पष्‍टपणे जाणवते. त्‍यामुळे इंदिरा गांधीच्‍या जीवनाशी साम्‍य असणा-या 'ऑधी'वर सुरुवातीच्‍या काळात काही दिवस बंदी घालण्‍यात आली होती. गुजझार यांनी अनेक चित्रपटांसाठी इतर भाषांतील कथा किंवा चित्रपटांमधूनही प्रेरणा घेतली आहे. तर 'परिचय' सारख्‍या चित्रपटात त्‍यांनी हॉलीवूडमधील काही आवाजही वापरले होते. नसिरुद्दीन शहा यांच्‍या अभिनयाने सजलेली 'मिर्झा गालिब' ही त्‍यांनी दिग्‍दर्शित केलेली दूरदर्शनवरील अशीच एक मालिका. दूरदर्शनवरील जंगल बूक, गुच्‍छे आणि पोटली बाबा की सारख्‍या मालिकांमध्‍ये त्‍यांनी पटकथा, संवाद आणि गीत लेखनही केले आहे.

काव्‍य लेखनात तीन ओळींचे कडवे असलेली 'त्रीवेणी' नावाची नवीन शैली गुलझार यांनी विकसित केली. त्‍यांचा 'कोई बात चले' हा जगजीतसिंह सोबतचा अल्‍बममधील गीते पूर्णतः याच शैलीतून तयार झाली आहेत.

समाजातील अनिष्‍ट पध्‍दती आणि प्रथांवर परखडपणे आणि यथार्थ टिका करणारा लेखक आणि दिग्‍दर्शक म्‍हणून गुलझार यांची ओळख आहे. विषयाची पक्‍की पकड आणि प्रवाही मांडणी यामुळे त्‍यांचे चित्रपट चिरस्‍मरणात राहतात. त्‍यांनी चित्रसृष्‍टीला दिलेल्‍या योगदानाबद्दल 2004 मध्‍ये त्‍यांना 'पद्म भुषण' या पुरस्‍काराने राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले आहे. या शिवाय उत्‍कृष्‍अ दिग्‍दर्शक आणि गीतकार म्‍हणूनही त्‍यांना राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. 2002 मध्‍ये त्‍यांना 'धुवॉं' या लघुकथेसाठी साहित्‍य अकादमी पुरस्‍कार देण्‍यात आला आहे.

सिनेसृष्‍टीतील तत्‍कालीन आघाडीची नायिका असलेल्‍या राखी यांची गुलझार यांचा विवाह झाला असून मेघना गुलझार ही नवोदित दिग्‍दर्शिका या दाम्‍पत्‍याची कन्‍या आहे. गुलझार तिला प्रेमाने 'बोस्‍की' म्‍हणतात. तिच्‍या नावावरूनच त्‍यांच्‍या घराचे नावही त्‍यांनी 'बोस्‍कीयाना' असे ठेवले आहे. मेघनाने आपल्‍या वडीलांच्‍या चरित्र 'बिकॉज् ही इज...' या नावाचे प्रकाशित केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner