कान्‍होजींच्‍या कारकीर्दीचा साक्षीदारः सुवर्णदुर्ग

Posted on Wednesday, April 07, 2010 by maaybhumi desk

1644100118145724624 महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न अशा कोकणच्या किनारपट्टीवर मोठ्या दिमाखात सुवर्णदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग उभा आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली या तालुक्यामध्ये आहे. दापोली पासून १६ कि.मी. अंतरावर हर्णे बंदर आहे. हर्णे बंदराच्या सागरात सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आहे.


सुवर्णदुर्ग या जलदुर्गाच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनार्‍यावर तीन किनारी दुर्गांची साखळी उभी ठाकलेली आहे. कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा गड हेह सुवर्णदुर्ग किल्याचे उपदुर्ग आहेत.


सुवर्णदुर्गला जाण्यासाठी मुंबई-पणजी महामार्गावर खेड हे तालुक्याचे गाव असून येथून दापोलीला प्रथम यावे लागते. दापोली पासून हर्णे बंदरापर्यंत गाडीमार्ग आहे. हर्णे गावातून गाडी गोवागडाच्या दारातून फत्तेदुर्गापर्यंत येते. हर्णे येथे मच्छिमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. यात अनेक हौशी पर्यटकांचाही सहभाग असतो.


किनार्‍यावर असलेल्या कनकदुर्ग किल्ल्यावर दीपगृह असल्याने तो किल्ला चटकन ओळखू येतो. या कनकदुर्गाच्या पायथ्याशीच धक्का आहे. येथून सुवर्णदुर्गाला जाण्यासाठी होडी मिळू शकते. काही हौशी मच्छिमारांनी एकत्र येऊन आपल्या पाचसहा होड्या सुवर्णदुर्गला जाण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. माणशी काही भाडे आकारुन ते आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ल्यावर फिरवून आणतात. यासाठी अगोदर चौकशी करणे गरजेचे आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे निघाल्यावर आपण प्रथम कनकदुर्गला वळसा मारुन सागरात प्रवेश करतो. जसे जसे किनार्‍यापासून दूर जावे तसे तसे दूरपर्यंतचा किनारा आपल्याला दिसतो.


सुवर्णदुर्ग किल्ल्याला धक्का नसल्यामुळे बर्‍याच वेळा गुडघाभर पाण्यामध्ये उतरुन पुळणीवर यावे लागते. सुवर्णदुर्ग किल्ल्याची भक्कम तटबंदी अजुनही सुस्थितीमध्ये आहे. किल्ल्याला पूर्वेच्या बाजूला म्हणजे किनार्‍याकडून एक प्रवेशद्वार आहे. तर पश्चिमेकडे सागराकडे एक प्रवेशद्वार आहे. किनार्‍याकडील प्रवेशद्वार पूर्वकडे असले तरी ते उत्तराभिमुख आहे. प्रवेशद्वार बाहेरच्या बुरूजाच्या माण्यामध्ये ठेवलेले आहे.


प्रवेशद्वाराजवळच हनुमानाचे शिल्प आहे. दाराच्या पायरीजवळ कासवाचे शिल्प कोरलेले आहे.


प्रवेशद्वाराच्या आत शिरल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या दिसतात. बाजूनेच तटावर जाण्याचा मार्ग आहे. येथून पुढे खूप गच्च रान माजलेले होते. नुकतेच पुरातत्व खात्याने साफसफाई सुरु केल्यामुळे किल्ल्यामध्ये फिरणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. दोन तीन वर्षापूर्वी आत पाय टाकणेही मुश्किल होते. तटबंदीवरुन कशी बशी फेरी मारावी लागायची.


प्रवेशदारातून समोर निघाल्यावर जवळच एक विहिर आहे. विहिरीच्या बाजूला वाड्याचा भक्कम चौथरा आहे. याच्या पुढच्या बाजूला कोठारे आहेत. येथूनच चोर दरवाज्याकडे जाणारी वाट आहे. या पश्चिमेकडील दरवाज्याला पायर्‍या नाहीत. या तटबंदीच्या उत्तर टोकाच्या बुरुजाजवळ दारूचे कोठार आहे. येथून पुन्हा दरवाज्याकडे येताना घरांची जोती लागतात. ही फेरी पूर्ण करायला अर्धा तास लागतो. आता तटबंदीवर चढून आतला आणि बाहेरचा परिसर न्याहाळता येतो.


मराठ्यांच्या इतिहासामध्ये अढळ स्थान प्राप्त करणारा सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६६० मध्ये आदिलशाहीकडून जिंकून घेतला. या किल्ल्याची भक्कम बांधणी महाराजांनी केली. पुढे हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. कान्होजींच्या कारकिर्दीची सुरवात सुवर्णदुर्गावर झालेली आहे. पुढे तळाजी आंग्रे, पेशवे व नंतर इंग्रज असे सत्तांतर होत गेले.


कान्होजी आंग्रे म्हणजे सागरावरचे शिवाजी असे समजण्यात येते. त्यांच्या दैदिप्तमान कारकिर्दीचा साक्षीदार असलेल्या सुवर्णदुर्गाची सहल निश्चित प्रेरणा देणारी ठरेल.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "कान्‍होजींच्‍या कारकीर्दीचा साक्षीदारः सुवर्णदुर्ग"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner