गणपती पुळे

Posted on Tuesday, April 13, 2010 by maaybhumi desk

7584_Mahas गणपती ही पुरातन काळापासून द्वारपाल देवता राहिली आहे. म्हणूनच भारतामध्ये चार दिशांना चार अशी गणपतीची महास्थाने आहेत. त्यापैकी एक म्हणजे गणपती पुळे. विस्तीर्ण समुद्र किनारा, नारळी पोफळीची दाटीवाटीने उभी असलेली झाडे असा सुंदर निसर्ग लाभलेले हे गणपती स्थान पर्यटनाच्या दृष्टीने देखील लोकप्रिय आहे.


गणपती पुळे हे लोकप्रिय ठिकाण रत्नागिरीच्या उत्तरेला आहे. या ठिकाणचा उल्लेख मुद्गल पुराणामध्येही आला आहे. पुळे हे नाव पडले ते इथे असलेल्या समुद्र किनार्‍यामुळेच कारण, पुलीन म्हणजे वाळवंट, आणि हे गणपतीस्थान समुद्रकाठच्या वाळूवर वसलेले असल्यामुळे या चे नाव पडले गणपती पुळे. या मंदिरामागे एक आख्यायिका अशी सांगितली जाते की परशुरामाची गणपतीवर अत्यंत श्रद्धा होती. त्याने आपल्या उपासनेसाठी सागर हटवून परशुराम क्षेत्र निर्माण केले आणि आपल्या उपासनेसाठी गणपतीचे तिथे अस्तित्व असावे म्हणून प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन गणपतीने इथे माझे अस्तित्व एकदंत, दोन गंडस्थळ, नाभी आणि पर्वतरुपाने राहिल, असा दृष्टांत दिला. तेव्हापासून इथे गणपतीची उपासना केली जाते. गणपती पुळ्याच्या या मंदिराला शिवाजी महाराजांनी आणि पेशव्यांनी देणग्या दिल्या होत्या.


गणपतीचे हे मंदिर समुद्रकिनार्‍यावर आहे. भव्य सभामंडप आहे. पण गाभारा दगडी असून अत्यंत लहान आहे. गणपतीचे दर्शन वाकूनच घ्यावे लागते. इथे गणपतीची चार हात, आयुधे घेतलेली अशी मूर्ती नसून फक्त दोन गंडस्थळे, नाभी आणि एकदंत एवढेच ठळक वैशिष्ट्ये असलेली मूर्तीganpatipule-temple आहे. या मूर्तीला चंदनाच्या गंधाचे सोंड, डोळे, कान यांचे रोज आकर्षकपणे आरेखन केले जाते. मंदिराचे तोंड पश्चिमेला आहे.
मंदिराचा शांत निवांत परिसर बघताक्षणीच मन हरखून जाते. मंदिराला प्रदक्षिणा घालायची तर ती संपूर्ण टेकडीलाच घालावी लागते. प्रदक्षिणेचा हा मार्ग साधारण अर्ध्या मैलाचा आहे. प्रदक्षिणा मार्गावर संपूर्ण फरसबंदी केलेली आहे. ही प्रदक्षिणा घालणे हा पण एक सुंदर अनुभव आहे. कारण प्रदक्षिणा पूर्ण टेकडीलाच घालावी लागते. आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्गात क्षणोक्षणी भेटीला येणारे समुद्र, नारळी पोफळीची झाडं यांचे अनेक देखावे मनाला आनंद देतात. परिसरात कौलारू घरं आहेत. समुद्राकाठची शुभ्र चमचमती वाळू, फेसाळणारा समुद्र आणि ही कौलारु घरं यांचे जिवंत पोर्ट्रेट मनाला सुखावणारा आहे.


मंदिराच्या सभामंडपात बसले तरी समुद्राची गाज सतत कानी पडते आणि तिथे निवांत बसून समुद्र न्याहाळणे ही देखील एख गंमत आहे. या सार्‍यामुळेच इथे पर्यटकांची कायम गर्दी असते. मंदिरात भाद्रपद चतुर्थी आणि माघ महिन्यातल्या चतुर्थीला मोठे उत्सव होतात. यावेळी मंदिरातल्या चांदीच्या गणपतीची पालखी प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात येते. सुरेख समुद्र किनारा लाभलेले, गणपतीचे हे महाद्वार आकर्षक निसर्ग आणि स्थानाच्या पावित्र्यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "गणपती पुळे"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner