घाटांचे गाव वाई
Posted on Saturday, April 10, 2010 by maaybhumi desk

वाई मधील घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदारांच्या रचना पेशवेकाळाची साक्ष देतात. पुणे ते वाई हे अंतर
कमी असल्याने पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य परिसराचा उपासनेसाठी निवड केली असे स्थानिक अभामानाने सांगतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये समानता आहे .
धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर आण्णि पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य. या मंदिरांमध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिध्द आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी१७७८ मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पुजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून ठेवली.
मंदिराच्या प्रवेशाचा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे . मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे.
शिखराची रचना लक्ष्मी यंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वात वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभार्यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिच्या हातात ढाल, तलवार आदी आयुध धारण केली आहेत. या लक्ष्मीला सोनेरी पैठणी , नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेच दर्शन घडविते. देवीची पुजा उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये किर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यत आवाज पोहचू शकतो.
आजही गणपतीघाटावर वसंतव्याख्यानमालेसारखे उपक्रम राबविण्यात येतात. असे हे वाई मंदिरांचे व घाटांचे गाव आहे. या ऐतिहासिक, सांस्कृतिक राजधानीला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

वाचण्यासारखे आणखीही काहीः
shivaji raje
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "घाटांचे गाव वाई"
Post a Comment