लालबाग-परळः झाली मुंबई सोन्याची

Posted on Monday, April 12, 2010 by maaybhumi desk


 - विकास शिरपूरकर

1990च्‍या दशकात मराठी नाट्यरसिकांना वेड लावणा-या जयंत पवार यांच्‍या अधांतरवर 'लालबाग-परळ झाली मुंबई सोन्‍याची' हा चित्रपट बेतला आहे. त्‍यामुळे त्‍याकडूनही तशी अपेक्षा होणे साहजिकच होतं. महेश मांजरेकरने हे आव्‍हान यशस्‍वीपणे पेलले आहे हे सांगण्‍याची गरज नसावी.

महेश मांजरेकर या अष्‍टपैलू कलावंतामध्‍ये निर्माता-लेखक-अभिनेता-दिग्दर्शक अशा अनेक भूमिका सहजपणे वठवण्‍याची असलेली हातोटी नक्कीच कौतुकास्‍पद आहे. हिंदीतून 'वास्‍तव' सारखे माईलस्‍टोन सिनेमे देणा-या महेशने सध्या मराठीकडे आपला मोर्चा वळवला आहे आणि तो एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट घेऊन येऊ लागला आहे हे सूचिन्‍ह म्हणायला हवे. 

'लालबाग-परळ झाली मुंबई सोन्‍याची' हा चित्रपटही त्याच्‍या याच 'वास्‍तव'वादी फ्रेममधूनच आपल्‍या समोर येतो. 'मुंबई शहराला वस्‍त्र देणा-या कामगारांनाच या शहराने विवस्‍त्र केलं' ही थीम घेऊन आलेल्‍या या चित्रपटाने 1982 च्‍या काळातील गिरणी कामगारांची चळवळ आणि त्यामुळे निर्माण झालेले असंख्‍य अनुत्तरीत प्रश्‍नांची मालिकाच प्रेक्षकांसमोर आणून ठेवली आहे.





'लालबाग-परळ'मध्ये असणा-या कापड गिरण्या आणि त्यावर अवलंबून असणारी कामगारांची लाखो कुटुंबं. कामगारांचा संप आणि बंद पडलेल्‍या गिरण्‍या यामुळे उपासमारीची वेळ आलेल्‍या असंख्‍य कुटुंबांपैकी एका कुटुंबाभोवती या सिनेमाची कथा फिरते.

अण्णा (शशांक शेंडे) एक मिल कामगार, मिलमधील विभाग बंद पडल्याने हातची नोकरी नाही. व्‍हीआरएसनंतरही पैसे देण्यास होत असलेली टाळाटाळ आणि त्यामुळे घरातल्‍या सहा तोंडांवर आलेली उपासमारीची वेळ अशा अडचणींच्‍या दुष्‍चक्रात हे कुटुंब अडकलं आहे.

मोठा मुलगा मोहन (विनीत कुमार) एका पतपेढीत दुकानांमध्ये जाऊन पैसे गोळा करण्याचे काम करतो. दुसरा मुलगा बाबा (अंकुश चौधरी) याला लेखनाची आवड असते. छोटा मुलगा नरू (करण पटेल) भाईगिरी करण्यात दिवस घालवतो तर मुलगी मंजू (वीणा जमकर) एका ब्युटी पार्लरमध्ये काम करून घरखर्चाला मदत करीत असते. या सगळ्यांना सांभाळणारी आई (सीमा विश्वास) कशी तरी सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय करीत असते. असे हे शेंडे कुटुंब...

सचिन खेडेकरने गिरणी कामगारांचा नेता राणे याची, गणेश यादवने परशा भाईची तर समीर धर्माधिकारीने कावेबाज आणि लालची मिल मालकाच्‍या भूमिकेला न्‍याय दिला आहे. मात्र या सर्वांमध्‍ये प्रभावी ठरतात ते विनय आपटे मिल मजुरांचं प्रतिनिधित्व, कळकळ आणि खचलेपण या सगळ्याचा कोलाज त्यांनी छान साकारला आहे. सतीश कौशिक यांनी मामा आणि कश्मीरा शहा मामीची भूमिकेत दिसतात त्यांचा मराठी चित्रपटातील वावर कृत्रिम वाटतो. मूळचे हिंदी सिनेमातील कलाकार असल्‍याने आणि या चित्रपटाची 'सिटी ऑफ गोल्ड -1982 एक अनकही कहानी' नावाने हिंदीतही निर्मिती झाल्‍याने ते या चित्रपटात असले तरीही ते उपरेच वाटतात.

एका वेळच्या अन्नाची वाणवा असल्याने गिरणी कामगारांची मुले कशी देशोधडीला लागतात, एका कुटुंबाची होणारी वाताहत, गिरणी मालकांची अरेरावी आणि घरखर्च चालवण्यासाठी शरीरविक्रय करणारी गिरणी कामगाराची मुलगी हे विदारक सत्य अस्‍वस्‍थ करणारे आहे.

शेंडे परिवारातील या सगळ्यांच्या भूमिका खूपच उत्कृष्ट झालेल्या आहेत. सीमा विश्वासने छोट्याश्या भूमिकेतही असहाय गिरणी कामगाराची पत्नी उत्कृष्टरीत्या साकार केली आहे. करन ने नारूची आणि अंकुश चौधरी ने बाबाची भूमिकाही चांगल्या पद्धतीने साकारली आहे.

या सर्वात सिद्धार्थ जाधव मी शिवाजी राजेनंतर पुन्‍हा एकदा गुंडाच्‍या भूमिकेत छान जमून आला आहे. मात्र त्‍याची तीच ती आरोळ्या मारून संवाद फेकीची पद्धत काहीशी वीट आणणारी आहे. त्याची देहबोली, त्याचा अभिनय एका गिरणी कामगाराच्या मुलाचे योग्य रूप पडद्यावर उतरवण्‍यात यशस्‍वी ठरत असला तरीही त्‍याचा आणखी प्रभावी वापर करून घेता आला असता.

खरे तर मुंबईचे वातावरण प्रदूषित असल्याने कॅमेर्‍यात चकचकीतपणा दिसत नाही परंतु काही दिग्दर्शक दाखवतात. महेशने हे टाळले आहे. हिंदी सिनेमाचं उत्तुंगपण महेशने मराठीमध्येही उतरवण्‍याचा पुरेपूर आणि यशस्‍वी प्रयत्न केला आहे. मात्र प्रेक्षकांना विचार करायला अवसर मिळाला असता तर सिनेमा अधिक प्रभावी ठरला असता.

गिरणी कामगारांच्या खडतर जीवनातील प्रेमप्रसंगही मोजक्याच दृश्यात महेशने दाखवले आहेत. परंतु काही ठिकाणी दृश्ये उगाचच ताणली आहेत असे वाटते. अर्थात ती दृश्ये अंगावर यावीत म्हणून महेशने असे केले असावे. एका दृश्यात सचिन खेडेकर एखाद्या वेड्याप्रमाणे भात खाताना दाखवला आहे. तेव्हा वाटते की हा आता वेडा झाला असावा परंतु दुसर्‍याच दृश्यात तो गिरणी कामगारांसमोर उत्कृष्ट भाषण देताना दिसतो.

एका कुटुंबाच्‍या  आणि त्‍या सोबतीने आख्‍या मुंबईच्‍याच संघर्षाचा इतिहास सांगणारा हा चित्रपट आजच्‍या परेल आणि लालबागच्‍या पॉश वस्‍तीत राहणा-या आणि मॉल्‍समध्‍ये खरेदी करायला जाणा-या तरुण पिढीसमोर वास्‍तव आणून ठेवणारा आहे.

दार मोशन पिक्चर्स प्रस्तुत
सत्य अश्वमी फिल्म्स द्वारा निर्मित.
निर्माता- अरुण रंगाचारी
दिग्दर्शक- महेश मांजरेकर
कथा-पटकथा- जयंत पवार, महेश मांजरेकर
गीतकार- श्रीकांत गोडबोले
संगीत- अजित परब.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner