अनामी रॉय पुन्हा पोलीस महासंचालक
मुंबई
मुंबई हल्ल्याच्या वेळी वादात अडकलेले आयपीएस अधिकारी अनामी रॉय यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालक पदी (डीजीपी) वर्णी लागली आहे. गृहमंत्रालयाने रॉय यांची या पदावर पुन्हा निवड केली आहे. राज्य पोलीस महासंचालक एस.एस.विर्क यांच्या निवृत्तीनंतर हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते.
मुंबई हल्ल्याच्या काळातही रॉय हेच डीजीपी होते. मात्र हल्ल्याच्या वेळी त्यांच्या निर्णय क्षमतेबाबत प्रश्न निर्माण झाले होते.
रॉय यांच्या नियुक्तीला सुप्रकाश चक्रवर्ती यांनी ‘कॅट’मध्ये आव्हान दिले होते. त्यानंतर कॅटने रॉय यांची नियुक्ती अयोग्य असल्याचा निर्णय दिला होता. त्याविरोधात राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयानेही ‘कॅट’चा निर्णय कायम ठेवून रॉय यांना चार आठवड्यात पदावरून दूर करण्याचे आदेश दिल्याने रॉय यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
त्यामुळे रॉय यांच्या जागी एस. एस. विर्क यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा पासून रॉय यांच्याकडे पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या महासंचालक पदाची जबाबदारी होती. मात्र या पदावर रुजू न होता रॉय रजेवर गेले होते.
No Response to "अनामी रॉय पुन्हा पोलीस महासंचालक"
Post a Comment