....तर एकही टॅक्सी चालू देणार नाहीः राज

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

मुंबईtaxi135
यापुढे मुंबईत नवे परवाने फक्त मराठीच टॅक्सी चालक दिले जावेत. जर राज्‍य सरकारने उत्तर भारतीयांना टॅक्सी चालकाचा परवाना देण्‍याचा प्रयत्नही केला तर मुंबईत एक‍ही टॅक्सी चालू देणार नाही. ही धमकी समजायची तर तसं समजा अशा शब्‍दात मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्र्यांना समज दिली आहे.

मुंबईत मराठी येणा-यांनाच टॅक्सी चालविण्‍याचा परवाना दिला जाईल या मंत्रिमंडळाच्‍या निर्णयानंतर उठलेल्‍या वादामुळे निर्णय मागे घेणा-या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना टॅक्सीच्या नव्या परवान्याबाबतच्या निर्णयाबाबत आज घुमजाव करीत असतानाच या सहज मिळालेल्या  फुलटॉसवर राज ठाकरे यांनी सणसणीत राजकीय षटकार खेचला असून नवे परवाने केवळ मराठी तरुणांनाच मिळाले पाहिजेत, असा दम सरकारला भरला आहे.

रद्द करण्यात आलेल्या टॅक्सी परवान्यांचे नूतनीकरण करताना मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणा-यांनाच हे परवाने दिले जातील, असा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे दरवर्षी नवीन ४५०० टॅक्सी मुंबईत धावणार आहेत. त्याबाबतचे पत्रकही मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाने जारी केले होते. या पत्रकानुसार मराठीचे ज्ञान असलेल्यांनाच परवाने दिले जातील, असे स्पष्ट होत होते. या निर्णयाबाबत देशभरात वादळ उठले. या गदारोळानंतर आज अचानक मुख्यमंत्र्यांनी आपल्या कालच्या भूमिकेत बदल करीत  मराठी बरोबर हिंदी व गुजराती येणा-यांनाही परवाने दिले जातील असे जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला असून उत्तर प्रदेशीयांना टॅक्सी परवाने दिल्यास एकही नवी टॅक्सी मुंबईत फिरू देणार नाही, असा इशारा त्‍यांनी दिला आहे. यापूर्वी देण्यात आलेले परवाने तपासून पाहण्याची मागणीही राज यांनी केली. ही धमकी समजायची असेल तर ती तशी समजा, असे थेट आव्हानही त्‍यांनी दिले.

वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे आज मनसेच्या पदाधिका-यांच्‍या बैठकीनंतर राज यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. चव्हाण स्वकर्तृत्वावर मुख्यमंत्री झाले नसल्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना ‘मॅडम’ काय म्हणतील, याचाच विचार त्यांच्या डोक्यात असतो. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकटे कसे बदलू शकतात, असा सवाल उपस्थित करून राज म्हणाले की, निर्णय घेण्याची क्षमता नव्हती तर निर्णय घेतलाच कशाला?

अशोक चव्हाण हे बुळचट व लाचार असून त्यांच्याकडे स्वाभिमान नावाची गोष्टच नाही, सेवायोजन कार्यालयात नोंदणी झालेले राज्यातील ४० लाख लोक नोक-यांसाठी कधी बोलावणे येईल याची वाट पाहात आहेत. अशावेळी सर्वप्रथम राज्यातील मराठी बेरोजगारांना कामाची संधी मिळाली पाहिजे, त्यानंतरच अन्य लोकांचा विचार करता येईल, असे राज यांनी ठणकावून सांगितले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "....तर एकही टॅक्सी चालू देणार नाहीः राज"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner