हम तुम और घोस्टः प्रेमळ भूतकथा
Posted on Friday, April 02, 2010 by maaybhumi desk
दिग्दर्शक : कबीर कौशिक
गीत: जावेद अख्तर
संगीतकार : शंकर एहसान लॉय
कलाकार : अरशद वारसी, दीया मिर्जा, बमन ईरानी, जेहरा नकवी, टीनू आनंद
'हम तुम और घोस्ट' ही रोमॅंटिक कॉमेडी आहे. हा चित्रपट नक्कीच तुम्हाला काही चांगले क्षण देतो आणि त्याचवेळी अर्शद वारसी हा किती अष्टपैलू अभिनेता आहे याचा प्रत्ययही देतो. मुन्नाभाईमधील सर्किट आणि इश्कियातल्या बब्बनच्या पलीकडेही अर्शद अभिनेता म्हणून काही आहे याची जाणीव हा चित्रपट पाहून होते.
अर्शद वारसी हा व्यवसायाने फॅशन फोटोग्राफर आहे, परंतु मद्यपीही आहे. त्याला भूत दिसते आणि त्याच्याशी बोलतेसुद्धा. तो ज्या नियतकालिकासाठी काम करतो, त्याच्या संपादिकेच्या (दिया मिर्झा) प्रेमात तो पडलाय. तो तिला भूत दिसत असल्याचे सांगतो आणि ती त्याला वेड्यात काढते. या दोघांचे प्रेम आणि त्याच्या जोडीने भूतकथा चालत रहाते.
कथेत फार वळणे नाहीत. त्यामुळे अगदी अपेक्षित वळणे घेतच ती मुक्कामाला पोहोचते. पण तो प्रवास बरा झाला आहे. टिपीकल बॉलीवूडी चित्रपटातलाच परंतु तरीही वेगळा असे या चित्रपटाला म्हणता येईल. तुलनाच करायची झाली तर या आधी आलेल्या भूतनाथ आणि अल्लादिन या 'प्रेमळ' भूतकथांच्या चित्रपटात हा नक्कीच उजवा आहे. फक्त त्याची लांबी मात्र अनावश्यकरित्या जास्त आहे.
