मी पदाचा दुरूपयोग केलेला नाही: थरूर
Posted on Friday, April 16, 2010 by maaybhumi desk
आयपीएलच्या कोची संघाच्या मालकांशी माझा कुठलाही संबंध नसून या संघाला फायदा पोचवून देण्यासाठी मी पदाचा गैरवापर केलेला नाही. केरळचा एक संघ असावा अशी सामान्य केरळवासीयांप्रमाणेच माझीही इच्छा होती. मात्र तसा संघ तयार होऊ नये यासाठीच काही लोकांनी माझ्यावर आरोप लावले, असा दावा उपपरराष्ट्र मंत्री शशी थरूर यांनी केला आहे.
लोकसभेत सादर केलेल्या एका लिखित वक्तव्यात थरूर यांनी आपल्यावर निराधार आरोप केले जात असून या संपूर्ण वादात सुनंदा पुष्कर यांचे नाव गोवले गेल्याबद्दल आपण दुःखी असल्याचे म्हटले आहे. आयपीएल कोची संघात सुनंदा पुष्पर यांनी 70 कोटी रुपये गुंतवले असून हे पैसे थरूर यांचे असल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे.
थरूर यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे, की आयपीएल कोचीकडून मला कुठलाही फायदा नाही. मात्र मला कोची संघाबद्दल अभिमान आहे. या सर्व प्रकरणात आयपीएल कमीश्नर ललित मोदी यांची वागणूक अनैतिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणात केरळ कंसोर्टियमचा संरक्षक म्हणून असण्यामागे माझी भूमिका केवळ तिरूअनंतपुरममधून खासदार असल्यामुळे आहे. ही भूमिका केंद्रीय मंत्रीमंडळाचा सदस्य म्हणून असलेल्या जबाबदारीत राहून असल्याचेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, थरूर यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असलेल्या विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे सुरूवातीला कामकाज दोन वेळा आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले. शशी थरूर यांनी या वादा संदर्भात स्पष्टीकरण देण्यास सुरूवात केल्यानंतर विरोधकांनी जोरदार गदारोळ घालत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे कामकज तहकुब करावे लागले अखेर थरूर यांनी आपले स्पष्टीकरण लिखित स्वरूपात लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांना सोपविले.
यापूर्वी गुरुवारी सायंकाळी झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी शशी थरूर यांना क्लीनचीट दिलेली नाही.
लेबले:
breaking news,
cricket,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
news,
top news,
आयपीएल
