माझी भाषा... माझी संस्‍कृती

Posted on Sunday, April 25, 2010 by maaybhumi desk


महाराष्‍ट्राच्‍या कडेकपा-या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्‍या तलवारीच्‍या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्‍माला आली तशीच आपल्‍या अनुभव विश्‍वाच्‍या आणि शिक‍वणुकीच्‍या बळावर पोलादी समाज मन घडवणा-या संत विभूतींनीही या भूमीला आपल्‍या अस्तित्‍वाने पावन केले आहे. साहित्य, काव्‍यशास्‍त्र संगीत आणि अष्‍टकलांची खाण असलेल्‍या शिवबाच्‍या या भूमीत तुम्ही-आम्ही जन्‍माला आलो. याचा निश्चितच सर्वांना अभिमान वाटणे साहजिकच आहे.

याच मातीने रोहिडेश्वराला स्‍वरक्ताने अभिषेक घालून स्‍वराज्याची शपथ घेणारे शिवरायही जन्‍माला घातले आणि 'स्‍वराज्य हा माझा जन्‍मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार' असे ठणकावून सांगणा-या लोकमान्‍यांनाही घडवले. याच मातीने मायमाऊली ज्ञानदेव आणि तुकारामही जन्‍माला घातले आणि बाबा आमटे, सचिन तेंडुलकर आणि गानकोकीळा लता मंगेशकर यांच्‍या कार्याची प्रेरणाही हीच भूमी...

छातीचा कोट करून मोगली साम्राज्याला राखून धरणारा मर्द मावळा याच भूमीतला आणि स्‍वातंत्र्याच्‍या ध्‍येय्यापोटी समुद्र पोहून जाण्‍याची ताकत असलेला विनायक दामोदर सावरकर नावाचा महापुरूषही याच भूमीतला.

जितका रंजक इथला इतिहास तितकाच वैविध्यपूर्ण इथला निसर्गही!

फेसाळलेले सागर किनारे आणि उधाणलेल्‍या दर्याला आव्‍हान देणा-या लालमातीतला कोकणी माणूस असो किंवा उत्तूंग सह्याद्रीच्‍या कडेकपा-यांना आव्‍हान देत काळ्या आईच्‍या सेवेत रमणारा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सर्व याच भूमीची लेकरं...

या पावनभूमीची महती सांगणारी वेबसाईट कविवर्य कुसूमाग्रजांच्‍या जन्‍मदिनाचे आणि मराठी दिनाचे औचित्‍य साधून आम्ही वाचकांच्‍या सेवेसाठी सुरू केली आहे. गेल्‍या काही वर्षांपासून प्रसारमाध्‍यमाच्‍या क्षेत्रात कार्यरत असल्‍याने या भूमीतील नररत्नांबद्दल माहिती देतानाच वाचकांपर्यंत ताजी बातमी लवकरात लवकर पोचावी असा प्रयत्न आम्‍ही याद्वारे करीत आहोत. 

पहिला घास भरवणा-या मायभूमीचे आणि पहिला शब्‍द बोलायला शिकवणा-या मायबोलीचे ऋण कधीही फेडणे अशक्यच! मात्र तरीही माझा हा बालहट्ट...!

वाचकराजा तुझ्या शुभेच्‍छांच्‍या बळावर...!

आमचा हा प्रयत्‍न कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा... आणि हो मायभूमीच्‍या मुक्तमंचावर तुमच्‍या लेखणीचेही स्‍वागतच...






वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "माझी भाषा... माझी संस्‍कृती"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner