Showing posts with label jyoti basu. Show all posts
Showing posts with label jyoti basu. Show all posts

प.बंगालमध्‍ये चक्रीवादळात 45 ठार

कोलकाता

पश्चिम बंगालच्‍या उत्तरी दिनाजपूर जिल्‍ह्यात मंगळवारी रात्री आलेल्‍या भीषण चक्रीवादळात सुमारे 45 जण मारले गेले असून सुमारे 100 जण बेपत्ता झाले आहेत. तर 50 हजार लोक बेघर झाले आहेत.

वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली असून त्यात अजुनही अनेक जण दाबले गेले असण्‍याची शक्यता आहे. बचाव कार्य वेगाने सुरू करण्‍यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. तर बेघरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यात आले आहे.

तेजःपूंज 'ज्‍योती'

-नितीन फलटणकर



कोलकात्त्यातील एका उच्च मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात 8 जुलै 1914 साली एक मूल जन्माला आले. ज्योती बसू असे या मुलाचे नाव. कुटुंबीयांनी दिलेले ज्योतिरींद्र बसू असे नाव शाळेत गेल्यानंतर कधी ज्योती बसू झाले ते कळलेच नाही.

मुलाने भरपूर शिकावे अशी इच्छा त्यांच्या वडिलांची होती. या दृष्टिकोनातून ज्योती बसू यांच्यावर संस्कारही सुरू झाले. पण लहानपणापासून या मुलात विलक्षण वेगळेपण होते. जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही, तोपर्यंत ती करायचीच नाही असा बसू यांचा होरा होता.

ढाका जिल्ह्यातील (आता बांगलादेशची राजधानी) बोर्डी गावात त्यांचे वडील निशिकांत बसू डॉक्टरकी करत. बसू यांनीही डॉक्टर बनावे असे निशिकांत यांना कधीही वाटले नाही. त्यांनी आपल्या मुलाला आपले करियर ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले होते.

बसू यांनी प्रेसीडेंसी कॉलेजमधून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर कायदे विषयाचा अभ्यास करण्यासाठी ते ब्रिटनला रवाना झाले. इथेच भूपेश गुप्ता यांच्या माध्यमातून ते प्रथम ब्रिटनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आले.

1940 चा काळ असेल. बसू पुन्हा भारतात परतल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात सर्व प्रथम सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. या काळात ते पूर्णवेळ कम्युनिस्ट पक्षाचेच काम करत.

1944 मध्ये ते ट्रेड युनियनच्या चळवळीत उतरले. यानंतर अवघ्या दोन वर्षातच ते बंगाल विधिमंडळावर प्रथम निवडून आले आणि आमदार झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या नऊ पोलित ब्युरो सदस्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.

1967 आणि यानंतर 1969 मध्ये ते संयुक्त आघाडीच्या माध्यमातून पश्चिम बंगालचे उप मुख्यमंत्री बनले. 21 जून 1977 ते 6 नोव्हेंबर 2000 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. सर्वाधीकाळ मुख्यमंत्री पदावर राहणारे ते देशातील एकमेव नेते आहेत. त्यांचा हा विक्रम अद्याप कोणताही नेता मोडू शकला नाही.

1996 मध्ये तर केंद्रात नवीन आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान म्हणून त्यांचेही नाव चर्चेत होते, पोलित ब्युरोने संयुक्त आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने जनता दलाचे एच डी देवेगौडा या काळात पंतप्रधान झाले. पोलित ब्युरोची मोठी घोडचूक असल्याचे नंतर पक्षाने मान्य केले.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर तब्येत साथ देत नसल्याने बसू यांनी 2000 मध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

पक्षातील त्यांची जागा त्यांनी केव्हाच भक्कम केली होती. कम्युनिस्ट पक्ष आणि बसू असे समीकरणच बनले होते. आरोग्य साथ देत नसल्याने त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची विनंती पक्षाला केली होती, परंतु ही विनंती पक्षाने अमान्य करत पुन्हा 2005 मध्ये पोलिस ब्युरोत त्यांची नियुक्ती केली. 13 सप्टेंबर 2006 रोजी पुन्हा बसू यांनी पक्षापुढे निवृत्तीचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु बसू यांनी 2008

पर्यंत काम करावे अशी विनंती त्यांना पक्षातर्फे करण्यात आली.

ज्‍योती बसू यांचे निधन

कोलकाता

गेल्‍या अनेक दिवसांपासून जन्‍ममृत्युची झुंज देत असलेले प.बंगालचे माजी मुख्‍यमंत्री ज्‍योजी बसू यांचे अखेर रविवारी सकाळी 11.47 वाजेच्‍या सुमारास निधन झाले. ते 96 वर्षांचे होते.

बसू यांना 8-10 दिवसांपूर्वी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले होते. तेव्‍हापासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. त्‍यांना गेल्‍या तीन दिवसांपासून व्‍हेंटीलेटरवर ठेवण्‍यात आले होते. आज अखेर त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या आणि मुख्‍यमंत्री बुध्‍ददेव भट्टाचार्य यांच्‍या परवानगीनंतर त्यांची कृत्रिम श्‍वसन यंत्रणा काढून घेण्‍यात आली.

मंगळवारी अंत्‍यसंस्‍कार


बसू यांच्‍यावर मंगळवारी अंत्यसंस्‍कार केला जाणार आहे.  कोलकाताचे महापौर विकास भट्टाचार्य यांनी दिलेल्‍या माहितीनुसार त्‍यांचा मृतदेह आज दुपारी दोन वाजता अंतिम संस्कार पार्लर पीस हेवन नेले जाणार असून 19 जानेवारी रोजी केवडातला स्‍मशानात अंत्यसंस्‍कार केला जाणार आहे.

ज्योती बसू यांनी नेत्रदान करण्‍याचा संकल्‍प केला असल्‍याने एक नेत्र रुग्णालयाच्‍या डॉक्टरांनी त्‍यांचे डोळे काढून सुरक्षित ठेवले आहेत. तर त्‍यांनी वैद्यकीय अभ्‍यासक्रमासाठी आपले शरीरही दान करण्‍याचा संकल्‍प केला असल्‍याने त्यांचे शरीरही दान केले जाणार आहे.
8 जुलै 1914 रोजी जन्‍मलेले बसू हे अनेक वर्षे प.बंगालचे मुख्‍यमंत्री होते. मार्क्सवादी कम्युनिष्‍ट पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले बसू आयुष्‍यभर या विचारांना टीकून होते. आपल्‍या राजकीय कारकिर्दीच्‍या काळात 1996 मध्‍ये त्‍यांना पंतप्रधान बनण्‍याचीही संधी आली मात्र त्यांनी ती विनम्रपणे नाकारली.
 
पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते विमान बोस आणि गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी त्यांच्‍या निधनाची अधिकृत घोषणा केली. त्‍यांच्‍या मृत्यूबद्दल पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह, राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील, संपुआ आघाडीच्‍या अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी दुःख व्‍यक्त केले आहे.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner