… तर मी पक्ष बंद करेनः राज
मुंबई
चित्रपटांचा परिणाम होऊन सरकार जागे होणार असेल तर मीसुद्धा माझा पक्ष बंद करून चित्रपट निर्मितीत उतरेन असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या चित्रपटाच्या ध्वनिफितीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. राज ठाकरे येणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडियाने चांगलीच गर्दी केली होती. झेंडा चित्रपटाबाबत राज ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती. ध्वनिफितीचे प्रकाशन केल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या या शिक्षण पद्धतीचाच दोष आहे. आपल्या शिक्षणमंत्र्यांना जो झटका येतो ते आपले शैक्षणिक धोरण असते, महेशने चित्रपटाच्या माध्यमातून सरकार आणि पालकांना जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर चित्रपट पाहून सरकार जागे होणार असेल तर मीसुद्धा माझा पक्ष बंद करून चित्रपट निर्मितीत उतरेन. कारण आम्हीसुद्धा सरकारलाच जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
‘अस्तित्व’च्या दिग्दर्शनानंतर पुन्हा एकदा महेश मांजरेकर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. याप्रसंगी चित्रपटाचे कलाकार सक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकरही उपस्थित होते. संगीतकार गायक अजित परब याने चित्रपटातील एक गीत याप्रसंगी गायले. मुख्य अभिनेता भरत जाधव मात्र अन्य कामात व्यस्त असल्याने कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.
या कार्यक्रमापूर्वी राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी ‘बत्ती गुल पॉवर फुल’ नावाच्या मराठी चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन केले. समीर गुप्ते आणि महेंद्र वाघमारे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश देशपांडे यांनी केलेले आहे. मकरंद अनासपुरे आणि ज्योती जोशी अभिनीत या चित्रपटात वीज समस्येवर आधारीत कथानक आहे.
No Response to "… तर मी पक्ष बंद करेनः राज"
Post a Comment