व्ही. के. मूर्ती यांना फाळके पुरस्कार
मुंबई
प्रख्यात छायालेखक (सिनेमॅटोग्राफर) व्ही. के. मूर्ती यांना २००८ वर्षांसाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला. भारतीय सिनेमाला देखणेपण मिळवून देण्यात असलेल्या योगदानामुळे त्यांना गौरविण्यात आले.
बॉलीवूडमध्ये व्हायोलिनवादक म्हणून आलेले मूर्ती छायाचित्रणाकडे वळाले. त्यानंतर रंगीत छायाचित्रणात त्यांनी अमीट ठसा उमटवला. गुरूदत्तचा कागज के फूल, साहब बीवी और गुलाम या चित्रपटांच्या अप्रतिम छायाचित्रणासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. पण त्याशिवायही बाझी, जाल, चौदहवी का चांद, प्यासा, १२ ओ क्लॉक, जिद्दी आदी चित्रपटातील त्यांचे छायाचित्रणही उल्लेखनीय आहे. पाकिझा आणि रझिया सुलतान देखणा बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
गुरूदत्तशी त्यांचे सूर विशेष जुळले होते. त्यानंतर श्याम बेनेगल यांच्याबरोबरही त्यांनी भारत एक खोज या मालिकेसाठी काम केले. कृष्णधवल कालंखडात त्यानी प्रयोग केले. नवनवी आव्हाने पेलली. नवे तंत्रज्ञान आणले, त्याचा वापर केला आणि नवा धडा घालून दिला. कागज के फूल या भारतातील पहिल्या सिनेमास्कोप चित्रपटाचे छायाचित्रण करणारा पहिला छायाचित्रणकार म्हणून मूर्तींचे नाव नोंदले गेले आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारे ते ५६ वे कलावंत आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या जोडीला हा पुरस्कार त्यांना दिला जाईल. रोख दहा लाख रूपये, सुवर्ण कमळ, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
No Response to "व्ही. के. मूर्ती यांना फाळके पुरस्कार"
Post a Comment