शिक्षणाच्या नावावर 'मेलोड्रामा'

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

सत्य अश्वमी फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत
निर्माता- संजय छाब्रिया, सत्य मांजरेकर, अश्वमी मांजरेकर
कथा-पटकथा-दिग्दर्शन- महेश मांजरेकर
संवाद- दीपक कुलकर्णी.


संगीत- अजय-समीर-अतुल.
दिग्दर्शक महेश मांजरेकरला मराठी प्रेक्षकांची नस सापडलेली आहे. त्यांना भावनिक कसं बनवायचं याचं उदाहरण त्याने 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'च्या माध्यमातून घालून दिले होते. आता त्याने 'शिक्षणाच्या आयचा घो'मधून शिक्षणाचा मुद्दा प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे. मराठी माणूस तुलनेने शिक्षणाविषयी जास्त संवेदनशील असतो. ती संवेदनशीलता कॅश करण्याचा महेशचा प्रयत्न दिसतो.


'शिक्षणाच्या आयचा घो'मध्ये महेशने शिक्षणपद्धतीमुळे मुलांवर येणारे दडपण 'मेलोड्रामा'च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चाळीत रहाणारा मध्यवमर्गीय मधुकर राणे (भरत जाधव) श्री (सक्षम कुलकर्णी) आणि दुर्गा (गौरी वैद्य) या आपल्या मुलांबरोबर रहात असतो. श्रीला क्रिकेटऐवजी अभ्यासावर भर द्यायला तो सांगत असतो. परंतु, श्री ऐकत नाही. एक दिवस रागाच्या भरात मधुकर श्रीला मारतो आणि तेवढ्या माराने श्री कोमात जातो. यानंतर मधुकरचे डोळे उघडतात आणि तो शिक्षण पद्धती बदलवण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटाची कथा ही एवढीच आहे.

भरत जाधव खूपच चांगला अभिनेता आहे. त्याला चांगली भूमिका दिली तर तो त्याचे सोने करतो आणि हे त्याने या चित्रपटात दाखवून दिलेले आहे. गरीबीने खचलेला आणि मुलांसाठी काहीही करण्यास तयार असलेला मधुकर त्याने छान उभा केला आहे. सक्षम आणि गौरीने ही चांगले काम केले आहे. सिद्धार्थ जाधवने आपली भूमिका चांगली साकारली आहे. नलिनीच्या भूमिकेत क्रांती रेडकरने प्रभाव पाडला आहे. महेश मांजरेकर स्वतः सुरुवातीला शिक्षक आणि नंतर डॉक्टरच्या भूमिकेत आहेत. मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत सचिन खेडेकर आहे.

मांजरेकरांनी विषय चांगला घेतला आहे, परंतु, यातही समस्याच मांडलेली आहे. त्याचे निराकरण कसे करावे हे काही सांगितलेले नाही. शिक्षणपद्धतीवर आसूड ओढणारा चित्रपट असे त्याने म्हटले आणि त्याप्रमाणे त्याने फक्त आसूड ओढण्याचेच काम केले आहे. मुलांना नापास करू नये. त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यास मदत करावी हेच दाखवले आहे, जे सगळ्यांना ठाऊक आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'चा हॅंगओवर मांजेरकरांवर अजूनही आहे हे या चित्रपटातही दिसून आले. प्रेक्षकांचे डोळे सतत ओले कसे राहतील याची पूर्णपणे दक्षता त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे चित्रपट पहाताना दोन रुमाल तरी जवळ अवश्य बाळगावेत. शिक्षणपद्धतीमध्ये बदल घडवण्यासाठी नव्हे तर रडण्यासाठी हा चित्रपट पहाण्यास हरकत नाही. संगीतकार अजय-समीर-अतुलचे संगीत ठीकठाक आहे. शीर्षक आणि तुझ्या बाबाला ही गाणी चांगली आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "शिक्षणाच्या नावावर 'मेलोड्रामा'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner