तुम (ना) मिलो तो सही

Posted on Saturday, April 03, 2010 by maaybhumi desk


निर्माता : निखिल पंचामिया
दिग्दर्शक : कबीर सदानंद
संगीत : संदेश शांडिल्य
कलाकार : डिंपल कपाडिया, नाना पाटेकर, सुनील शेट्टी, विद्या माळवदे, अंजना सुखानी, रेहान खान, मोहनीश बहल
यू सर्टिफिकेट * 2 तास 14 मिनिट
रेटिंग : 2/5


'तुम मिलो तो सही' ही तीन जोडप्यांची कहाणी आहे. वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर असलेल्या या जोडप्यांची प्रेमाची व्याख्याही वेगळी आहे. या तिन्ही कथांना जोडणारा सांधाही आहे.

नाना (सुब्रमण्यम) आणि डिंपल (दिलशाद) हे फिफ्टी प्लस जोडपे आहे. ऑफिसमधून सुब्रमण्यमला 'आऊटडेटेड' म्हणून काढून टाकले आहे. त्यामुळे नव्या पिढीवर तो चिडलेला आहे. चित्रपटातली ही कथा मस्त रंगली आहे. त्यात नाना व डिंपलच्या अभिनयाचे रंगही पहायला मिळतात.


सुनील शेट्टी व विद्या माळवदेची कथा म्हणजे करीयरच्या ऐन भरातल्या दाम्पत्यांची विविध कारणावरून होणारी भांडणे आहेत. नवरा घरासाठी आणि मुलांसाठी वेळ देत नाही ही बायकोची तक्रार आणि हे जे काही करतोय ते घरासाठीच ही नवर्‍याची मांडणी या दोहोंतला संघर्ष या कथेत आहे. पण त्याची मांडणी कंटाळवाणी आहे, त्यातच सुनील आणि विद्या यांचा 'फ' दर्जाचा अभिनय डोके उठवतो.

 या चित्रपटाची गाणी ऐका


तिसरी कथा रेहान व अंजना यांच्या प्रेमाची आहे. विशीतले हे जोडपे. त्यातल्या रेहानचे अंजनावर आणि तिचे मात्र भलत्यावर प्रेम आहे. पण तिला त्याच्या प्रेमाची जाणीव फार उशिरा होते.

या तिन्ही कथा डिंपलच्या कॅफेशी जोडल्या गेल्या आहेत. मुंबईच्या प्रमुख ठिकाणी वसलेला हा कॅफे एका मल्टिनॅशनल कंपनीला हवाय. पण डिंपल त्याला विरोध करते. वकील असलेला नाना त्यासाठी संघर्षात उतरतो. रेहान व अंजनाही या लढ्यात उतरतात. सुनील त्याच कंपनीचा सीओओ आहे, परंतु त्याची बायकोही डिंपलच्या बाजूने असते. याचा शेवट काय होणार हे कुणी सांगायची गरज नाही. पण सगळे सरधोपट जाते.

लेखक कबीर सदानंदपेक्षा त्यांच्यातला दिग्दर्शक प्रभावी वाटतो. अभिनयाच्या बाबतीत नाना-डिंपल वगळता 'बोंब' आहे. संपादन चांगले नाही. संगीतही नीरस आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner