मोदींच्या दबावानंतर पवारांचा बचावात्मक पवित्रा
Posted on Sunday, April 25, 2010 by maaybhumi desk
आयपीएलमधील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रूतली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून आपल्यावर राजीनाम्याचा दबाव आणण्याचा किंवा पदावरून दूर करण्याचा प्रयत्न झाल्यास आपण सर्वांचे पितळ उघडे करू अशी धमकी देणा-या ललित मोदींबाबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि आयसीसीच उपाध्यक्ष शरद पवार यांनी अधिक नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र ती घेतानाही आपला आयपीएलशी काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.
मोदींनी आपण राजीनामा देणार नाही आणि आपल्याला पदावरून दूर करण्याचा प्रयत्न झाल्यास आपण सर्वांचे पितळ उघडे पाडू अशी धमकी ट्विटरवरून दिली होती. मोदींच्या या धमकीचा परिणामी लगेच दिसून आला असून पवार यांनी त्वरित आपला आयपीएलशी काहीही संबंध नसल्याचा दावा पुन्हा एकदा करताना आपण निर्दोष असून कुठल्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. असे सांगतानाच त्यांनी आपल्या पक्षाचा किंवा पक्षाचे नेते नागरी उड्यन मंत्री प्रफुल्ल पटेल यांचाही आयपीएलशी संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
मोदीबाबत पवार यांनी आपली भूमिका अधिक मवाळ केली असून मोदींना केवळ काही अधिकार कमी करून पदावर कायम ठेवावे यासाठी पवारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरम्यान, गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव एन श्रीनिवासन, मुख्य प्रशासन अधिकारी रत्नाकर शेट्टी आणि आयपीएल उपाध्यक्ष निरंजन शाह यांनी रविवारी बीसीसीआयच्या मुख्यालयात काही वेळ बैठक केली.
सोमवारी होणा-या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत मोदींच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाणार असून त्या संदर्भात अंतिम खलबत रचण्यासाठी ही भेट झाल्याचे समजले जात आहे.
लेबले:
breaking news,
cricket,
current news,
hot news,
india,
indian news,
IPL,
IPLcricketnews/ iplscore,
top news,
आयपीएल
