आणिबाणी पुन्हा लागू केली का? अडवाणींचा सवाल
Posted on Monday, April 26, 2010 by maaybhumi desk
आयपीएलच्या मुद्यावरून प्रमुख नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या घटनेवर आज लोकसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. लोकसभेच्या कामकाजास सुरूवात होताच विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करून या मुद्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच वेळ घोषणाबाजी झाल्यानंतर सभागृहाचे तासाभरासाठी तहकुब करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना एका शासकीय कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती भवनात जायचे असल्याने त्यांना बोलण्याची परवानगी दिली. या संदर्भात अडवाणी यांनी फोन टॅपिंगची घटना घटनात्मक अधिकारांचे हनन असल्याचा आरोप केला असून सरकारने आणिबाणी पुन्हा लागू केली काय असा सवाल विचारला आहे. तर नागरिकांच्या खाजगी हक्कांच्या रक्षणासाठी नवीन कायदा बनविण्याची मागणी केली आहे.
फोन टॅपिंगची घटना सरळ आणिबाणीची आठवण करून देणारी असून या काळात 19 महिने देशातील अनेक बडे नेते, आजी-माजी राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचेही फोन टॅप करण्यात आल्याची आठवण करून देतानाच सरकारने तेच धोरण परत अवलंबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, का असा सवाल मनमोहन सरकारला केला आहे.
फोन टॅपिंग संदर्भातील कायद्याचा आधार घेत अडवाणींनी अशा प्रकारची फोन टॅपिंग केवळ राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास आणि आणिबाणीच्या काळातच करण्याचा सरकारला अधिकार असल्याचे लक्षात आणून दिले.
दरम्यान, लोकसभेच्या कामकाजास सुरूवात होताच विरोधकांनी याबाबत पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी संसदीय समिती गठीत करण्यात मागणी केली. या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार गदारोळ झाल्यानंतर कामकाज तहकुब करण्यात आले.
लेबले:
BJP,
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
news,
top news
