फोन टॅपिंग प्रकरण संसदेत गाजणार
Posted on Saturday, April 24, 2010 by maaybhumi desk
आयपीएल वादावरून विरोधी पक्षाच्या आरोपांचा सामना करीत असलेल्या सरकारसाठी राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता असून विरोधकांनी या संदर्भात सोमवारी संसदेत सरकारला धारेवर धरण्याचे संकेत दिले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हे प्रकरण घटनात्मक अधिकारांचे हनन असल्याचे म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि आयपीएल कमिश्नर ललित मोदी यांच्या फोनवरील संभाषणातून माहिती मिळविण्यासाठी पवार यांचे फोन टॅप करण्यात आले होते. तर त्या व्यतिरिक्त कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, माकपा नेते प्रकाश करात आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचेही फोन टॅप केले गेले असल्याचा दावा एका नियतकालिकाने केला आहे.
भाजपने या मुद्यांवर सत्यता आणि वास्तविकता समजून त्याचा अभ्यास सुरू केला असून सोमवारी होणा-या दोन्ही सभागृहाच्या कामकाजा दरम्यान हा मुद्दा प्रमुखपणे उपस्थित केला जाणार आहे. या संदर्भात इतर विरोधी पक्षांचीही मदत घेतली जाणार आहे.
यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणामुळे सरकार गडगडले असून केंद्रातील चंद्रशेखर सरकारचा कॉंग्रेसने पाठिंबा काढून घेतला होता. अशा स्थितीत कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
