मायावती आता स्वतःचे मंदिर उभारणार!
Posted on Saturday, April 03, 2010 by maaybhumi desk
उत्तर प्रदेशात राज्यभर आपले पुतळे स्थापण्याचा धडाका लावलेल्या मुख्यमंत्री मायावती यांनी आता राज्यात लवकरच आपले मंदिर उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील आर्थिकदृष्ट्या सर्वात मागास असलेल्या बुंदेलखंड प्रांतातील महोबा येथून 300 किमी अंतरावरील नाथपुरा गावात 'दलित की बेटी' अशी ओळख असलेल्या मायावतींचे मंदिर उभारले जाणार आहे.
महोबा येथील वकील कन्हैया लाल यांच्या खासगी जमिनीवर हे मंदिर उभारले जाणार असून तेथे मायावतींची मूर्ती ठेवण्यात येणार असल्याचे कन्हैया लाल यांनी सांगितले. लाल हे बसपचे कार्यकर्ते नसून, एक दलित आहेत. मायावती यांना नोटांचा हार घातल्यानंतर उफाळलेल्या वादातून आपणास त्यांचे मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 1970 मध्ये चांदी तुला करण्यात आली होती. तेव्हा त्यात कोणलाही वावगे
वाटले नाही. मात्र मायावती दलित आहेत म्हणून त्यांना एवढा विरोध होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
