बुधवारी विदर्भ बंद; सर्वत्र कडेकोट बंदोबस्त
नागपूर
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या बुधवारचा बंद यशस्वी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. हा बंद म्हणजे विदर्भवाद्यांचे शक्तीप्रदर्शनच राहणार आहे. बंद यशस्वी व्हावा यासाठी काल आणि आज कुठे धरणे तर कुठे सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. अनेक नेत्यांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन होमहवन आणि पूजा केली. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विदर्भवादी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली असून, आतापर्यंत शेकडो कार्यकत्यांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हा वकील संघटनेनेही या बंदला पाठिंबा दर्शविताना सोमवारी रिझर्व्ह बँक चौकात निदर्शने केली. या बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, उद्याचा बंद नव्हे हरताळ स्वयंस्फूर्त असेल. नागरिक स्वयंस्फूर्तीने कामकाज बंद पाडून प्रस्थापित व्यवस्थेबद्दलचा आपला राग व्यक्त करतील, असा विश्वास स्वतंत्र विदर्भ संग्राम समितीचे नेते काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी व्यक्त केला आहे.
एकीकडे बंद काळात हिंसाचार होऊ नये, सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीची हानी होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे तर दुसरीकडे रेल्वे वाहतूक रोखण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रेल्वे पोलिसही सज्ज झाले आहेत. त्याचप्रमाणे विदर्भातून राज्याच्या इतर भागांना होणारा वीज पुरवठा रोखण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रशासनाने इस्मा कायदा लागू केला आहे.
पोलिसांनी बंद संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राजकीय पक्षांच्या नेत्यांना नोटिसा दिल्याची माहिती आहे. या प्रकाराचा खासदार मुत्तेमवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. लोकशाहीत हरताळ हा आमचा अधिकार असल्याचा दावा केला आहे.
राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्या विदर्भात तैनात करण्यात आलेल्या आहेत. सोबतच ४०० होमगार्डस्ही तैनात करण्यात आले आहेत. या सर्वांनीच आजपासूनच आपापली पोझिशन सांभाळली आहे. चौका-चौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, रिपाइंचे सर्व गट आणि इतर राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत तर, हा बंद हाणून पाडण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही पुढे सरसावली आहे.
No Response to "बुधवारी विदर्भ बंद; सर्वत्र कडेकोट बंदोबस्त"
Post a Comment