केमरून ब्रिटनचे नवे पंतप्रधान!
लंडन
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कंजरवेटिव पक्षाचे नेते डेव्हीड केमरून यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून कंजरवेटीव्ह पक्षाने लिबरल डेमोक्रेटिक पक्षासोबत आघाडी बनविण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, या घटनाक्रमानंतर विद्यमान पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
लिबरल डेमोक्रेट पक्षाचे नेते निक क्लेग यांनी दोन्ही पक्ष तडजोडीसाठी चर्चा करीत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर क्लेग आणि केमरून यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतर आघाडीचा निर्णय निश्चित झाला आहे. मात्र अजूनही दोन्ही पक्षांमध्ये काही बाबीसंदर्भात मतभेद असून त्याबाबत चर्चेच्या फे-या सुरू आहेत.
ब्रिटन संसदेच्या 650 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सरकार बनविण्यासाठी 326 जागांची आवश्यकता असते. या वेळच्या निवडणुकीत कंजरवेटिव पक्ष 306 जागा मिळवून मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरीही त्यांना सत्ता स्थापनेसाठी 20 जागांची आवश्यकता आहे.
त्यामुळे कंजरवेटिव पक्षाने 57 जागा जिंकलेल्या लिबरल डेमोक्रेटिक पक्षासोबत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न चालविले आहेत.